भारत, पाकिस्तान अन् चीन एकत्र येवु शकतात ‘आमने-सामने’, रशिया करणार बैठकीचं आयोजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाने मॉस्को येथे १० सप्टेंबर रोजी शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा प्रस्ताव ठेवला आहे. या बैठकीत पाकिस्तान आणि चीनचा सहभागही पाहायला मिळणार आहे. त्याच दिवशी मुत्सद्दी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रशियाने ब्रिक्सच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याचीही ऑफर दिली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार सूत्रांनी सांगितले की, कोरोनापूर्वीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सध्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन केल्यावरच भारत आपल्या सहभागाची पुष्टी करू शकतो, कारण अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही की, भारत मॉस्कोमधील नियोजित सभेत भाग घेईल.

जर भारताने यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर भारत आणि चीनमधील लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) संघर्षानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनचे परराष्ट्र मंत्री एकाच गटात पहिल्यांदा समोरासमोर येतील. एलएसीवर तणाव कायम आहे, कारण अद्याप सीमेवर पूर्णपणे विघटन झालेले नाही. या भागात ४०,००० भारतीय सैनिकांना कथित स्वरूपात तैनात केले गेले आहे आणि भारत आणि चीन दोन्ही देश परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी सैन्य व मुत्सद्दी चर्चेत आहेत.

गलवान खोऱ्यात चीनबरोबर रक्तरंजित संघर्ष झाल्यापासून भारत आणि चीनमधील एलएसीवरील तणाव कायम आहे. जूनमध्ये रशियाने बोलावलेल्या आरआयसीच्या बैठकीत भारत सहभागी होता. मात्र ती बैठक कोरोना संसर्गाच्या विषयावर मर्यादित केली गेली होती. तसेच आता एससीओ एक मोठा राजकीय अजेंडा असेल. त्यामुळे भारत आपल्या उपस्थितीची पुष्टी करतो की नाही हे पाहणे बाकी आहे. भारत पाकिस्तानशी कोणत्याही चर्चेला विरोध करत आहे आणि ते म्हणाले की, चर्चा आणि दहशत एकत्र चालू शकत नाही, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा होण्याची शक्यता फारच कमी आहे. जरी भारत या बैठकीत भाग घेत असेल तरी.