Video : LAC वर गरजले राफेल, फॉरवर्ड एयरबेसवरून घेतले उड्डाण, जवानांच्या मदतीसाठी पुढे आले लडाखचे लोक

लडाख : पोलीसनामा ऑनलाइन –   पूर्व लडाखमध्ये एलएसीवर तणाव असताना भारतीय हवाई दलाने सुद्धा आपली तयारी जय्यत करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानाने सोमवारी लडाखच्या फॉरवर्ड एयरबेसवरून उड्डाण घेतले. राफेल भारतीय हवाई दलात 10 सप्टेंबरला सहभागी केले होते. चीनचे आडमुठे धोरण पाहता भारतीय लष्कराने महत्वाच्या पर्वतांवर आपले ठाण मांडले आहे. सूत्रांनुसार, भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये 20 पेक्षा जास्त पर्वतांवर आपली पकड मजबूत केली आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की, 29 ऑगस्टपासून सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यादरम्यान भारतीय लष्कराने मागर हिल, गुरंग हिल, रेचन ला, रेजांग ला, मुखपरी आणि फिंगर-4 च्या जवळील एका उंच पर्वतावर कब्जा मिळवला आहे. रणनितीच्या दृष्टीने या पर्वतांवरून चीनी लष्कराच्या करवायांवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. एलएसीवर हे पर्वत भारतीय सीमेच्या आत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चीनने या पर्वतांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे एलएसीवर मागील काही दिवसांत तीनवेळा गोळीबार झाला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लष्कर हिवाळ्याच्या हंगामासाठी तयारी करत आहे. या कामात लडाखचे लोकसुद्धा मदत करत आहेत. लडाखचे लोक लष्कराच्या जवानांसाठी स्थानिक अन्न साहित्य जमावण्याची तयारी करत आहेत. लडाखच्या बहुतांश भागात तपामान -20 ते -30 डिग्रीपर्यंत पोहचते. अशा स्थितीत भारतीय जवानांसाठी स्थानिक भोजन उपयोगी ठरते. स्थानिक लोक भारतीय जवानांसाठी ड्राय फूड्स पाठवत आहेत.