उद्यापासून पावणे दोन लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरही होणार रेल्वे तिकिटे बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर १ जूनपासून सुरू होणाऱ्या नियमित गाड्यांसाठी गुरुवारी तिकिटांची विक्री सुरु होताच गर्दी झाली. ऑनलाईन विंडो उघडण्यासोबत प्रचंड ट्रॅफिक झाले, ज्यासाठी रेल्वे मंत्रालय यावेळी पूर्ण तयार होते. एकूण १०१ गाड्यांच्या तिकिटासाठी संध्याकाळी चार वाजेपासून ५.५१ लाख प्रवाशांचे तिकीट बुक झाले होते.

रेल्वे मंत्र्यांनी केली घोषणा
तिकीट बुकिंग करण्याच्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, “शुक्रवारपासून देशातील सुमारे पावणे दोन लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरून रेल्वे तिकिट बुकिंग सुरू होईल.”

परत येण्यासाठी देखील बुक करत आहेत तिकीट
रेल्वेमंत्री गोयल यांनी सोशल मीडियावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, महानगरांकडून छोटी शहरे व जिल्ह्यात जाण्यासाठीच तिकिटे बुक केली जात नाहीत, तर तिकिटांचे ‘रिव्हर्स बुकिंग’ही होत आहे. म्हणजेच लोक जाण्यासह रिटर्न तिकिट देखील बुक करत आहेत. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिसा सारख्या राज्यांमधून रिटर्न तिकिटे सर्वाधिक बुक केली जात आहेत.’

गाड्यांच्या संख्येत वाढ, तिकिट विंडोद्वारे बुकिंगसाठी प्रोटोकॉल जारी होईल
१ जूनपासून देशातील विविध राज्यांसाठी एसी आणि नॉन एसी एकूण २०० गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्यात येईल, असे रेल्वेमंत्री म्हणाले. गोयल म्हणाले की, रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेता लवकरच पुढच्या दोन-तीन दिवसात नव्या प्रोटोकॉलच्या आधारे काही रेल्वे स्थानकांवर तिकिट बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. दुर्गम भागात ज्यांच्याकडे संगणक किंवा मोबाईल अ‍ॅप्ससारख्या सुविधा नाहीत, त्यांना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येत आहे.

प्लॅटफॉर्मवरील दुकाने आणि स्टॉल्स उघडण्यात आले
सीएससीचे सीईओ डीसी त्यागी म्हणाले की, ग्रामीण भागात पंचायत स्तरावर उघडलेल्या या केंद्रांच्या सॉफ्टवेअरमध्ये आयआरसीटीसीची लिंक आधीपासूनच आहे. भारतीय रेल्वेच्या परवानगीनंतर आरक्षण तातडीने चालू होईल. परिस्थिती सामान्य करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. त्याअंतर्गत सर्व रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील दुकाने आणि स्टॉल्स तातडीने उघडण्यात आले आहेत.

आतापर्यंत १०१ गाड्यांची बुकिंग सुरु केली गेली
मात्र ज्या राज्यात कोरोनाचा प्रभाव जास्त आहे, अशा राज्यात जाणाऱ्या गाड्यांचे तिकिट बुकिंग सुरू केलेले नाही. पण लवकरच अशा राज्यांच्या स्थितीत सुधारणा झाल्यावर त्यांच्यासाठी तिकिट विक्री सुरू होईल. यामुळेच आतापर्यंत केवळ १०१ गाड्यांसाठी तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.