नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी, PM-NSA सह बरीच माहिती होती उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून चीनच्या हेरगिरीच्या घटनेनंतर आता एक मोठे प्रकरण समोर आले आहे. नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) चे अनेक संगणक हॅकर्सनी हॅक केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने सप्टेंबरच्या सुरूवातीलाच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एनआयसीच्या या संगणकांमध्ये भारतीय सुरक्षा, नागरिक, मोठ्या व्हीआयपी लोकांशी संबंधित डेटा उपलब्ध असतो. यामध्ये पंतप्रधान ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या डेटाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला बेंगळुरू येथील एका फर्मकडून केला गेला आहे. एनआयसीच्या कर्मचार्‍यांना एक मेल आला होता, ज्याने त्या मेलच्या लिंकवर क्लिक केले, त्याचा डेटा गायब झाला.

या सायबर हल्ल्यात सुमारे १०० संगणकांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. ज्यात काही एनआयसीचे होते आणि काही आयटी मंत्रालयाशी संबंधित होते.

या प्रकरणानंतर एनआयसीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण सूत्रांच्या माहितीनुसार हा मेल बेंगळुरूमधील एका अमेरिकन कंपनीकडून आला होता. ज्याची माहिती आयपी ऍड्रेसवरून मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वीच एका अहवालात दावा करण्यात आला होता की, काही चिनी कंपन्या सुमारे दहा हजार भारतीयांवर लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, नेते, खेळाडू, कलाकार अशा अनेक नामांकित व्यक्तींच्या डेटावर नजर ठेवली जात आहे. चिनी कंपनी या सर्वांच्या हालचालींची नोंद ठेवत आहे.

याबाबचा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता, त्यानंतर चिनी दूतावासात परराष्ट्र मंत्रालयाने तक्रार दाखल केली. तसेच एक समिती गठित केली गेली आहे, जी संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like