Coronavirus : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ! ट्रेनच्या कोचला बनवलं ‘आयसोलेशन वॉर्ड’, जाणून घ्या काय-काय बदल करून बनवले Ward

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संक्रमणामुळे होणार्‍या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांच्या उपचारासाठी भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे डब्ब्यांना आयसोलेशन केंद्र बनविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने माहिती देताना सांगितले कि, उत्तर रेल्वेने कोविड- १९च्या रुग्णांसाठी गैर वातानुकूल रेल्वे डब्यांचे स्वतंत्र वार्डात रूपांतर करून आयसीयूचा पहिला मसुदा तयार केला आहे. पुढील काही दिवसांत हे स्वरूप निश्चित झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे विभाग दर आठवड्यात 10 डब्यांचा रेक तयार करेल.

या रेल्वे कोचमध्ये डॉक्टर आणि नर्ससाठी केबिन, रूग्णांसाठी केबिन आणि वैद्यकीय उपकरणे व औषधे ठेवण्यासाठी स्वतंत्र केबिन आहेत. प्रत्येक केबिनला कव्हर करण्यासाठी कोचमध्ये विशेष प्रकारचे पडदे बसविण्यात आले आहेत. हे रेल्वे डबे विविध रेल्वे स्थानकांवर पार्क केले जातील. रुग्णांसाठी केबिन तयार करण्यासाठी मधल्या बर्थला एका बाजूला हटवले आहे. रूग्णाच्या बर्थसमोरचे सर्व तीन बर्थ काढण्यात आले आहेत. बर्थवरील चढण्यासाठीच्या सर्व शिड्या काढून टाकल्या गेल्या आहेत. आइसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरूम, कॉरिडॉर व इतर ठिकाणांचेही आकार बदलण्यात आले आहेत.

दरम्यान, भारतात शनिवारी कोविड -19 प्रकरणे वाढून 873 झाली असून या संक्रमणामुळे आतपर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी साडे नऊ वाजता आपल्या आकडेवारीत कोविड -19 मधील आणखी दोन जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात एक- एक मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून गुजरातमध्ये तीन, कर्नाटकात दोन, मध्य प्रदेशात दोन, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक जणांच्या मृत्यूची नोंद आहे.