भागवत-योगी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. युपीमधील शामली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांना एक चिठ्ठी मिळाली आहे. यामध्ये योगी, केजरीवाल आणि भागवत यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच स्टेशन मास्टर यांना मिळालेल्या चिठ्ठीत नेत्यांसह काही मंदिरांना देखील निशाणा बनवण्यात आला आहे.

चिठ्ठी मिळाल्यानंतर देशात लगेच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्य़ाने घेतले असून याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) दिला आहे. शामली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर विक्रांत सरोहा यांना रजिस्टर पोस्टाने ही चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. हे पत्र २० एप्रिल रोजी स्टेशन मास्तर यांच्या कार्य़ालयात आले आहे.

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मैसूर अहमदच्या नावाने हे पत्र लिहून पाठवण्यात आले आहे. यामध्ये त्याने आपल्या लोकांच्या मृत्यूचा बदला आवश्य घेऊ असे लिहले आहे. या पत्रात उत्तर प्रदेश, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आरएसएस प्रमुखांना लवकरच जीवे मारू असे लिहले आहे.

या पत्रानंतर अयोध्या, मथुरा यासह अनेक धार्मिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. प्रवाशांच्या वस्तूंचीही तपासणी करण्यात येत आहे. मथुरा आणि अयोध्येत अॅलर्ट जारी करण्यात आला असून जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.