वचनबध्द ! पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं स्वप्नातील घर, मृत्यूच्या 3 वर्षानंतर असं केलं ‘जिवंत’

बेंगळुरु : पोलीसनामा ऑनलाइन –   कर्नाटकच्या कोप्पल येथील एका उद्योगपतीने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मारणार्थ तिच्या स्वप्नातील घर बांधले. तसेच आपल्या नव्या घरात पत्नीची सिलीकॉन वॅक्सची हुबेहुब मूर्ती स्थापन करून श्रद्धांजली अर्पण केली. उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा जुलै 2017 मध्ये कार दुर्घटनेत मृत्यू झाला होता. आता माधवी यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेल्या सिलीकॉन वॅक्सच्या हुबेहुब मूर्तीची स्थापना आपल्या घरात केली आहे. वास्तुविशारद रंगनानावर यांच्या मदतीने मूर्ती त्यांच्या नव्या घरात स्थापन केली आहे.

छायाचित्र निरखून पाहिले असता माधवी यांची प्रतिमा इतक्या सफाईदार पद्धतीने बनवण्यात आली आहे की, त्या एकदम जीवंत वाटत आहेत. यामध्ये त्यांना मॅजेंटा साडी आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये दाखवले आहे, त्या सोफ्यावर बसल्या आहेत. आपल्या पत्नीच्या मूर्तीबाबत बोलताना श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचे नवे घर माधवीच्या स्वप्नातील घर होते. ही प्रतिमा बेंगळुरूचे कलाकार श्रीधर मूर्ती यांनी एका वर्षात तयार केली आहे.

श्रीनिवास गुप्ता म्हणाले, पत्नीला पुन्हा एकदा घरात पाहणे एक सुखद अनुभव आहे, कारण हे तिच्या स्वप्नातील घर होते. सिलिकॉनचा वापर स्थिरतेसाठी केला आहे. तर, फोटो पाहून इंटरनेटवर यूजर्स भावूक होत आहेत आणि आपल्या पद्धतीने शुभेच्छा सुद्धा देत आहेत.