पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय मंगळवारी २१ ऑगस्ट रोजी  घेण्यात आला. केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आलेल्या मॉडेल अ‍ॅक्ट आणि ई-ट्रेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठीचे हे एक पाऊल आहे. त्यानंतर आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.
या निर्णयानंतर आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्व कारभार प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती जाणार आहे. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी पूर्वीपासून केल्या जात होत्या. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमधील गैरप्रकार दूर करण्यासाठी नुकताच केंद्र सरकारने मॉडेल अ‍ॅक्ट तयार करत, अंमलबजावणीसाठी तो राज्य सरकारकडे पाठविला होता. यामध्ये प्रामुख्याने नियमनमुक्ती, बाजार शुल्काची एकदाच वसुली (वन टाइम सेस), ऑनलाइन लिलाव (ई नाम) आदी सुधारणांचा समावेश आहे. मॉडेल अ‍ॅक्टमधील बदलानुसार बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतदेखील प्रस्तावित करण्यात आले होते. हे करण्यासाठी राज्याच्या पणन कायद्यात बदलाची गरज होती. यासाठी गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू होते. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कायदा बदलाचा मसुदा मंजुरीसाठी ठेवला जाणार होता. मात्र तो आलाच नाही. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक या बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यांतून जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आवक होते.  त्यामुळे या समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळणारच होता. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे बाजार समितीचा यापूर्वीच ‘ई नाम’ योजनेत समावेश झालेला आहे. त्यामुळे ‘ई ट्रेडिंग’ आणि ऑनलाईन लिलाव सुरू करण्यात अडचण येणार नाही. राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळात सुमारे २३ जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे प्रशासकीय मंडळ आएएएस अधिकार्‍याच्या अध्यक्षेताखाली किंवा कृषी अथवा पणन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचा प्रस्ताव आहे. तो अंतिम व्हायचा आहे.
[amazon_link asins=’B01N6OOW52,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd34b1f5-a607-11e8-b572-5d242bca1b0c’]