Lockdown in India : संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागणार का? देशातील ‘या’ राज्यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या देशात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. काही राज्यात मर्यादित किंवा पूर्ण लॉकडाऊन आहे. याचा परिणाम दिसून येत आहे. अशावेळी राष्ट्रीय लॉकडाऊन लावणे हा अतिरेक होईल, शिवाय गरीबांच्या समस्या वढतील. म्हणजे केंद्र सरकार लॉकडाऊनच्या बाजूने नसल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्ट आणि औद्योगिक संघटनांनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सुद्धा राष्ट्रीय लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. सरकार यास योग्य मानत नाही. त्यांच्यानुसार मागच्या लॉकडाऊनच्या वेळी अनेकांनी टीका केली होती, परंतु त्यावेळी आवश्यकता यासाठी होती कारण व्हायरसबाबत लोकांना काहीही माहिती नव्हते. ट्रीटमेंटबाबत गोंधळ होता.

देशभरात ऑक्सिजन आणि बेडची टंचाई
सध्या ऑक्सीजन आणि बेडच्या पुरवठ्याबाबत देशभरात समस्या आहे, ज्यावर सातत्याने काम केले जात आहे. या कमतरतेच्या पुरवठ्याचा लॉकडाऊनशी काही संबंध नाही. आकड्यांनुसार 17 राज्य अशी आहेत जिथे 50 हजारपेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. पाच राज्य अशी आहे जिथे संसर्गाचा दर पाच टक्केपेक्षा कमी आहे. इतर नऊ राज्य अशी आहेत जिथे हा दर 5 ते 15 टक्केच्या दरम्यान आहे. जर जिल्ह्यांबाबत बोलायचे तर देशात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये स्थिती नियंत्रणात आहे. अशावेळी राष्ट्रव्यापी लाकडाऊन लावून कोणते लक्ष्य साध्य होणार असे केंद्राचे मत आहे. अनेक कंपन्यांमध्ये काम होत आहे. निर्यात होत आहे, ती थांबवल्याने आर्थिक स्थिती बिघडेल, सुधारणार नाही.

लॉकडाऊनचा निर्णय राज्यावर सोडला
सरकारचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. काही राज्यांनी यावर अंमलबजावणी सुद्धा केली आहे. महाराष्ट्रात प्रतिबंध लागू आहेत, बिहारने 15 मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

केंद्राकडून गाईडलाईन सुद्धा आहे की, जर परिसरात बेड 60 टक्के पेक्षा जास्त भरले किंवा संसर्गाचा दर 10 टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास कंटेन्मेंट झोन बनवावा. काही राज्यांमध्ये निष्काळजीपणा झाला आहे त्यांना सतर्क केले आहे. आता सुरू असलेल्या कोरोनाच्या विध्वंसानंतर पुढील काही दिवसात सकारात्मक बदल येण्यास सुरूवात होईल, अशी शक्यता काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन सध्या प्रासंगिक नाही असे केंद्राचे मत आहे.

यूपीमध्ये सुरू असलेला साप्ताहिक लॉकडाऊन आणखी दोन दिवसांसाठी वाढवला आहे. बिहारमध्ये 5 ते 15 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दिल्लीत लॉकडाऊन आणखी 7 दिवस वाढवला आहे. हरियाणात 3 मे पासून 7 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनसारखेच असलेले प्रतिबंध 15 मेपर्यंत वाढवले आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये आंशिक लॉकडाऊन आहे. ओडिसामध्ये 5 मेपासून 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. केरळा, तमिळनाडुमध्ये प्रतिबंध जारी आहे.