वाढणार चीनचे टेन्शन; ब्रह्मपुत्र नदीवर सर्वांत जास्त लांबीचा पूल बनवणार भारत, जोडले जाणार व्हिएतनाम आणि भूतान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेजवळ तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीनच्या मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीवर भारत सावध झाला आहे. भारत सीमांवर रस्त्यांचे मजबूत जाळे उभे करण्याच्या प्रयत्नात असून, ब्रह्मपुत्र नदीवर देशातील सर्वांत जास्त लांबीचा पूल बनवणार आहे. केंद्र सरकारने या उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, हा पूल विशाल ट्रान्स-आशियाई कॉरिडॉर एक मोठा जोड असेल जो व्हिएतनाममध्ये डेन नंग सह, भूतान आणि पूर्वोत्तर भारताला जोडण्याचे काम करेल. यामुळे चीनचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

ही मोठी योजना भारत आणि जपानमधील वाढती रणनिती भागीदारी दर्शवणारी आहे. तसेच चीनच्या अतिक्रमाणाला प्रतिबंध बसेल. भारताची ही महत्त्वाकांक्षी योजना अनेक आशियाई देश विशेष करून म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओसला मजबुती देईल. आसामहून मेघालयला जोडणार्‍या या पुलाची लांबी 19 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. हा पूल झाल्याने आसामच्या धुबरीपासून मेघालयाचे फुलबारी जोडले जाईल. इतकेच नव्हे तर यामुळे त्रिपुरा, बराक व्हॅली इत्यादी क्षेत्रात वाहतूक सूलभ होईल.

चीनच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या एका भागावर धरण बांधण्याच्या बातम्या आल्यानंतर भारत खूपच सतर्क झाला आहे. चीनला शह देण्यासाठी भारत ब्रह्मपुत्रा नदीवर अरुणाचल प्रदेशात 10 गिगावॉटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याची योजना बनवत आहे. ब्रह्मपुत्र नदी जी चीनमध्ये यारलुंग त्सांगबोच्या नावाने ओळखली जाते, ती तिबेटमधून निघून अरुणाचल प्रदेश आणि आसामहून बांगलादेशपर्यंत जाते. चीनने धरण बांधल्यास भारतीय भागात पुराची शक्यता निर्माण होईल. याच कारणामुळे चीनच्या धरणामुळे उत्पन्न प्रभाव कमी करण्यासाठी भारतालासुद्धा अरुणाचलमध्ये एक मोठे धरण बांधावे लागेल. भारताने यावर निर्णय घेतला आहे.