YesBank Scam : मुंबईत ‘या’ 7 ठिकाणी CBI चा छापा, राणा कपूरच्या कुटूंबासह DHFL च्या चेअरमनविरूध्द ‘लुकआऊट’ नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँक प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मुंबईत 7 ठिकाणी छापेमारी करत आहे. मिळालेल्या महितीनुसार, ही छापेमारी डिएचएफएलचे ऑफिस, डॉयट अर्बन व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आरकेडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड, वरळी येथील राणा कपूर यांचे निवासस्थान, बांद्रा येथील कपिल वाधवान, राणा कपूरच्या मुली राखी कपूर-टंडन आणि राधा कपूर-खन्ना यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी सुरू आहे.

सीबीआयने जारी केली लुकआउट नोटीस
सीबीआयने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदु राणा कपूर आणि त्यांच्या मुली रोशनी कपूर, राखी कपूर आणि राधा कपूर यांच्या विरूद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. याशिवाय, सीबीआयने कपिल वाधवान, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धीरज राजेश कुमार वाधवान यांच्याविरूद्ध सुद्धा लुकआउट नोटीस जारी केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, अधिकार्‍यांनी मुंबई आणि दिल्लीत अनेक ठिकाणी छापे मारले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने किमान 7 ठिकाणी छापेमारी केली.

सीबीआय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा छापेमारी पूर्ण होईल त्यानंतर प्रेसला याबाबत माहिती दिली जाईल. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने 7 मार्चला येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (राणा कपूर कुटुंबियांशी संबंधित कंपनी), कपिल वधावन (दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष) आणि अन्य लोकांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली होती.

सीबीआयने येस बँकेचे राणा कपूर, दिवाण हाऊसिंग (डीएचएफएल) आणि डीओआयटी अर्बन व्हेंचर्स कंपनीच्या विरूद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. अधिकार्‍यांनी रविवारी ही माहिती दिली. कपूर सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात आहे.