भारताचा पाकिस्तानला इशारा ! ‘गिलगिट बाल्टिस्तान आमचा अभिन्न भाग, तो ताबडतोब रिकामा करा’

नवी दिल्ली : गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या कुरापतीवर भारताने कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारताने म्हटले आहे, पाकिस्तानने त्या परिसरातून बाहेर पडावे, ज्यावर त्यांनी अवैध पद्धतीने कब्जा केला आहे. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देऊन तिथे निवडणुका घेण्याची घोषणा करत भारताला डिवचले. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात विरोध केला आहे.

गुलाम काश्मीर आमचा अभिन्न भाग
मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, भारत आपल्या कोणत्याही क्षेत्राची स्थिती बदलण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फेटाळत आहे. केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखचे सर्व क्षेत्र आमचे अभिन्न भाग आहे. यामध्ये गुलाम काश्मीरचा सुद्धा सहभाग आहे. अवैध पद्धतीने कब्जा मिळवलेल्या परिसरावर पाकिस्तानचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानच्या छळामुळे या क्षेत्रात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे.

श्रीवास्तव यांनी म्हटले परिसराची स्थिती बदलण्यापेक्षा पाकिस्तानने तात्काळ आपला अवैध कब्जातील क्षेत्रातून बाहेर पडावे. पाकिस्तानने जगाला धोका देण्यासाठी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची घोषणा सुद्धा केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला या क्षेत्रात निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. या निर्णयानंतर भारताने वरिष्ठ पाकिस्तानी राजदूतांसमक्ष आपला आक्षेप नोंदवला होता.

श्रीवास्तव यांनी म्हटले की, पाकिस्तानकडून या क्षेत्रात केलेले छेडछाडीचे प्रयत्न तिथे सात दशकांपासून राहात असलेल्या लोकांना स्वातंत्र्यापासून वंचित करत आहेत. 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीर भारतीय संघात सहभागी झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखसह तथाकथित गिलगिट बाल्टिस्तानचे क्षेत्र कायदेशीर दृष्ट्या भारताचे अभिन्न अंग आहे. पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोकांच्या मानवाधिकारांना पायदळी तुडवता येणार नाही. या क्षेत्राची स्थिती बदलण्याचा पाकिस्तानचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा भारताने दिला आहे.