Coronavirus : दिलासादायक ! गेल्या 24 तासांत 11 हजाराहून अधिक रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 60 टक्क्यांच्या जवळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा संसर्ग जेवढ्या वेगाने पसरत आहे तेवढ्याच वेगाने कोरोना बाधित रुग्ण बरे होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 11 हजार 881 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 3 लाख 59 हजार 859 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) 59.52 टक्के आहे. सध्या देशामध्ये 2 लाख 26 हजार 947 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. या रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 80 हजार 298 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 93 हजार 154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात 79 हजार 091 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर राज्यात कोरोनामुळे 8 हजार 053 जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या जास्त असली तरी दोन्ही राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 94049 जणांना कोरोनाचे संक्रण झाले आहे. यामध्ये 52926 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे 39859 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1264 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.