सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्या समर्थनार्थ उतरल्या खासदार नवनीत राणा; म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सचिन तेंडुलकर, गाणसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटर विराट कोहली यांच्यासह इतर सेलिब्रिटींकडून केलेल्या ट्विटवरून जोरदार चर्चा सुरु आहे. आता या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुढे आल्या आहेत.

नवनीत राणा यांनी सांगितले, की “देशाच्या समर्थनार्थ बोलतोय की विरोधात हे सांगण्याची गरज देशातील ‘रिअर हिरों’ना नसते. ही एक लोकशाही आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे जर कोणी त्यांनी केलेल्या ट्विटवरून त्यांचे परीक्षण करत असेल तर ते भारतविरोधी आहेत.’

महाराष्ट्र सरकारकडून चौकशीचे आदेश

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांच्यासह इतर सेलिब्रिटींकडून केले गेलेल्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारच्या दबावातून हे ट्विट तर त्यांनी केले नसेल ना, या संशयावरून ट्विटची चौकशी केली जाणार आहे.

काय केलं होतं सचिनने ट्विट…

अमेरिकेतील पॉप सिंगर रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्यासह काही परदेशी व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देत ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर #IndiaTogether #IndiaAgainstPropoganda या हॅशटॅगसह सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले होते.