अमानुष : प्रियकरासह पळून जाण्याची महिलेला मिळाली ‘ही’ शिक्षा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सामाजिक पद्धतींचा परिणाम अनेक महिलांना भोगावा लागतो. मंगळवारी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात अशीच एक अमानुष घटना पाहायला मिळाली. महिला तिच्या प्रियकराबरोबर गेली, तेव्हा परत आल्यावर तिला कठोर सामाजिक शिक्षेचा सामना करावा लागला. नवऱ्याला तिच्या खांद्यावर बसविले गेले आणि एक तास हा तमाशा चालू राहिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्या नवऱ्यासह सात जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांचा शोध सुरू आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डावर यांनी सांगितले की, कल्याणपुरा पोलिस ठाण्यांतर्गत गाव खेडाची महिला आपल्या प्रियकराबरोबर गेली होती. तिच्या प्रियकराच्या कुटुंबीयांनी महिलेला कल्याणपुरा पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी माहिती मिळताच तिच्या सासरकडचेही पोलिस ठाण्यात आले.

नवऱ्याला खांद्यावर बसवून गावभर फिरविले
सदर महिलेला सासरकडच्यांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर कल्याणपुरातून घेऊन जात सासरकडच्यांनी महिलेला शिक्षा दिली. तिचा अनेक प्रकारे अपमान करण्यात आला. नवऱ्याला महिलेच्या खांद्यावर बसविले गेले आणि गावाची चक्कर मारायला लावली. यावेळी एकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तेथे पोहोचून कारवाई केली. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.