Lockdown Effect : कशामुळं रस्त्यावर उतरण्यास भाग पडले लोक ? भावुक करेल पायी जाणार्‍या लोकांची आपबीती

0
23
crowd

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतरही हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. उत्तर प्रदेशचे योगी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकारने आवाहन करूनही स्थलांतरित मजुरांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे 1000 किलोमीटर लांब घर असूनही पावले थांबत नाहीत. रस्त्यावर यांचे वेगवेगळे कळप दिसत आहे. प्रवाशांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक बस थांबवून त्यांची मजबुरी सांगत त्यांना वरती चढू देत नाहीत. इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे ते पायीच त्यांच्या घराकडे चालत आहेत. महामार्गावर जाणार्‍या लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांची मजबुरी समोर आली. त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग हा भावुक करून सोडणारा आहे.

हे देखील आहे स्थलांतर करण्याचे कारण

वास्तविक, लोकांना वाटते की लॉकडाउन पुढे वाढू शकतो. अशा परिस्थितीत लोकांना भीती आहे की या महिन्यात घरमालक जरी भाड्यासाठी त्रास देत नसेल, परंतु पुढच्या महिन्यापासून ते भाडे कसे देतील. काम तर बंद आहे, ते काम न करता इतके दिवस कसे राहतील, त्यांच्याकडे खाण्यापिण्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा नाही. येत्या आठवड्यात पुरेल इतके रेशनही नाही. त्यांच्याकडे जे काही रेशन आहे ते त्यांनी सोबत घेतले आहे. त्यांना आशा आहे की वाटेत काही मदत मिळाली तर ठीक, आणि नाही मिळाली तरी ते त्यांच्या घरी पोहोचतीलच.

मूळचा लखनऊचा रहिवासी असलेला विनीत त्याच्या अनेक मित्रांसह साकेत भागात भाड्याने राहात होता आणि याच ठिकाणी काम करायचा. पत्नी आणि मुले लखनऊमध्ये आहेत. लॉकडाउनमुळे त्याचा रोजगार बंद झाला आहे. अगदी रेशनही शिल्लक नाही. विनीत म्हणाला की वारंवार घरून फोन येत आहेत. त्यांना आमच्याबद्दल फार काळजी वाटते. तसेच यूपीमधील गोरखपूरचा रहिवासी राहुल म्हणाला की, चालण्यास पाच-सहा दिवस तरी लागतील, परंतु एकदा पोहोचल्यावर समस्या कमी होईल. तसेच पत्नी आणि मुलांना देखील आमची चिंता वाटणार नाही. आत्ता सार्वजनिक वाहतूक बंद आहेत. अशा परिस्थितीत चालणे ही मजबुरी आहे.

बडली औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कारखान्यात काम करणारे सुनील कुमार म्हणाले की, आता मोठ्या शहरांमध्ये राहायचे नाही, आपल्या गावातल्या लोकांच्या छायेत राहून जीवन व्यतीत करणार. सुनील मूळचा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहे. शुक्रवारी पहाटे ते दिल्लीहून गोंडाकडे निघाले. त्याच्याबरोबर कुटुंबातील इतर चार सदस्य आहेत, त्या सर्वांनी आपले कुटुंब सोडले होते आणि येथे रोजीरोटीसाठी आले होते. त्याच्यासमवेत गावी जाणारे प्रमोद यांनी सांगितले की, या कठीण परिस्थितीत त्याचे आई व वडील घरात एकटे आहेत, त्यांची देखभाल करणारा कोणी नाही. कारखान्याच्या मालकाने थोडे पैसे दिले आणि सांगितले की परिस्थिती सगळी ठीक होईल तेव्हा परत या.

सध्याच्या परिस्थितीत ना बसेस धावत आहेत ना गाड्या. कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपल्या प्रियजनांच्या काळजीत पायी चालणाऱ्या लोकांनी सांगितले की या कठीण काळात गावात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची चिंता आम्हाला चालण्यास भाग पाडत आहे. बहुतेक लोक वृद्ध पालकांना गावी सोडून येथे कामासाठी आले आहेत. अशा वेळी तिथे त्यांची काळजी घेण्यास कोणीही नाही. आम्हाला आमच्या प्रियजनांकडे पाठविण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. येथे कामासाठी गेलेले लोक हे रामपूर, लखनऊ, सहारनपूर, कानपूर, गोरखपूर, बिजनौर, मुझफ्फरनगर, बदायूं, आजमगड, चांदपूर, मेरठ, बरेली, बुलंदशहर, इटावा, जौनपूर, अमरोहा, पीलीभीत, संभल इ. भागातील आहेत.

अरुण कुमार मिश्रा (जिल्हाधिकारी उत्तर पूर्व जिल्हा) यांच्या म्हणण्यानुसार, ते स्वतः शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गेले होते. जे दिल्ली सोडत होते त्यांना दिल्लीत कोणतीही समस्या उद्भवणार नाही असे समजावून सांगितले. अन्नापासून ते आरोग्य सुविधांपर्यंत सगळी व्यवस्था शासनाकडून पुरविल्या जाणार आहेत. तेव्हा ते म्हणाले की त्यांना आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबासमवेत रहायचे आहे, म्हणून ते जात आहेत. पोलिसांना आदेश देण्यात आला आहे की जे लोक जिथे आहेत, त्यांना तिथेच राहू द्यावे, दिल्ली सोडून कोणालाही जाऊ देऊ नये.