लज्जास्पद ! ‘कोरोना’ व्हायरसमुळं दिल्लीतील ईशान्येकडील महिलेवर गुटखा खाऊन थुंकलं, जातीय अत्याचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे देशातील बहुतेक नागरिक सरकारला कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मदत करण्याकरीता आपल्या घरातच थांबून आहेत, तर काही लोक कोरोना विषाणूसाठी ईशान्यकडील लोकांना दोष देत आहेत. अशीच एक लाजीरवाणी घटना दिल्लीमध्ये उघडकीस आली आहे, ज्यात एका व्यक्तीने ईशान्य भागात राहणाऱ्या एका महिलेला ‘कोरोना’ म्हणून चिडवले आणि नंतर तिच्या कपड्यांवर गुटखा खाऊन थुंकले.

ही लज्जास्पद घटना उत्तर दिल्लीतील विजयनगरची आहे, जिथे ईशान्येकडील एक महिला आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली. महिला घराकडे जात असताना एक व्यक्ती स्कूटीवर आला आणि त्या महिलेला ‘कोरोना’ असे म्हणून छेडले आणि नंतर तिच्या कपड्यांवर गुटखा थुंकला. महिलेच्या कपड्यांवर थुंकलेल्या गुटख्याचे फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ईशान्येकडील अनेक कार्यकर्ते या लज्जास्पद घटनेला जातीय अत्याचार म्हणून संबोधत आहेत आणि पोलिसांकडून कारवाईची मागणी करत आहेत.

देशातील बहुतेक नागरिक कोरोना विषाणूंविरूद्ध लढा देण्यासाठी सरकारला मदत करत आहेत, परंतु काही खोडकर वृत्तीच्या अशा लज्जास्पद घटनांनी केवळ देशाची प्रतिमाच डागाळत नाही तर देशातील जातीयभेदाचे काळे सत्य देखील समोर येते.