राजस्थानच्या कोटाच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा निष्काळजीपणा, 24 तासात 9 नवजात बालकांचा मृत्यू, उडाली खळबळ

कोटा : वृत्तसंस्था – राजस्थानात कोटाच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा अनेक नवजात बालकांचा जीव गेला आहे. अवघ्या 24 तासात 9 बालकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जेके लोन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एस.सी. दुलारा यांचे म्हणणे आहे की, हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला 50 पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू होतो. परंतु, अवघ्या 24 तासात 9 बालकांचा मृत्यू होणे सामान्य बाब नाही. याची चौकशी केली जात आहे.

आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी घटनेचा रिपोर्ट हॉस्पिटल प्रशासनाकडून मागितला आहे. कुटुंबियांनी मेडिकल स्टाफवर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला होता. कुटुंबियांचा आरोप आहे की, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ योग्य प्रकारे देखभाल करत नव्हते. रात्रीच्या ड्यूटीवर तैनात स्टाफ झोपी जातो. रात्री बालकांची प्रकृती बिघडते तेव्हा सुद्धा लक्ष दिले जात नाही. असेच बुधवारी झाले.

ज्या बालकांचा जीव गेला आहे, त्यामध्ये चौघांचा जन्म जेके लोन हॉस्पिटलमध्येच झाला होता आणि पाच अन्य बालकांची प्रकृती बिघडल्याने रेफर करण्यात आले होते. बालकांचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. भाजपा आमदार संदीप शर्मा यांनी हॉस्पिटल प्रशासनावर निष्काळजीपणावर आरोप केला आहे.

आरोग्य मंत्री शर्मा म्हणाले, 9 नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे, ज्यापैकी 3 आणण्यात आले होते. मी निर्देश जारी केले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणा कोणत्याही नवजात बाळाचा जीव जाऊ नये. सीएम आणि सरकार या मुद्द्यावर गंभीर आहे. मागील वर्षी याच हॉस्पिटलमध्येच 35 दिवसात 110 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेत होते. त्यावेळी सरकारने हॉस्पिटल अधीक्षकासह अनेक डॉक्टरांची बदली केली होती.