मोदी सरकारनं 1000 विदेशी उत्पादने पॅरामिलिटरी कँटीनमधून हटवली, आजपासून नाही मिळणार सामान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशी वापरण्याचे आवाहन केले होते. आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. केंद्रीय पोलिस कल्याण भांडारातून १००० हून अधिक विदेशी उत्पादनांची विक्री बंद करण्यात आली आहे. यात मायक्रोवेव्ह ओव्हनपासून, फुटवेअर आणि ब्रँडेड उत्पादन जसे टॉमी हिलफिगर यांसह १००० हून अधिक उत्पादने आहेत. आता ही विदेशी उत्पादने केंद्रीय पोलिस कल्याण भांडार (KPKB) मध्ये उपलब्ध असणार नाहीत. या विदेशी उत्पादनांऐवजी आता कँटीनमध्ये स्वदेशी उत्पादने दिसून येतील. हा निर्णय देशभरात पॅरामिलिटरी (अर्धसैनिक दल) कँटीन चालवणाऱ्या संस्थेने घेतला आहे.

या कॅंटीनमध्ये १ जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकली जातील. हे पाऊल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वक्तव्यानंतर उचलण्यात आले आहे, ज्यात म्हटले गेले होते की, केवळ मेड इन इंडिया उत्पादनेच सर्व केपीकेबीच्या कॅन्टीनमध्ये विकली जातील. याशिवाय परदेशातून माल आयात करणार्‍या बर्‍याच कंपन्यांची उत्पादनेही कँटीनने हटवली आहेत. तसेच केपीकेबीने अशा काही कंपन्यांची उत्पादने कॅन्टीनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी त्यांना मागितलेली माहिती दिली नाही. केपीकेबीने आता सर्व उत्पादनांना तीन श्रेणीत विभागले आहे. यात प्रथम श्रेणी – उत्पादन भारतात निर्मित, दुसरी श्रेणी – कच्चा माल आयातीत, पण उत्पादन भारतात निर्मित आणि तिसरी श्रेणी – निव्वळ आयात उत्पादने सामील आहेत.

केंद्रीय पोलिस कँटीन सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्समध्ये काम करणाऱ्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० लाख कुटुंबाच्या सदस्यांना उत्पादन विकतात. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच घोषणा केली होती की, सीआरपीएफ आणि बीएसएफ सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (सीएपीएफ) सर्व कँटीनमध्ये १ जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकली जातील. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादने निवडण्याचे व आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. शहा यांनी देशातील नागरिकांना देशात बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले व इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले.