पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! PAK नं शस्त्र बांधून भारतीय सीमेमध्ये पाठवलं ड्रोन, BSF नं हाणून पाडला प्रयत्न

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तान आपल्या कुरघोड्या करण्यापासून मागे हटत नाही. सीमेपलीकडून भारतीय सीमेत टेहाळणी करण्याच्या हेतूसाठी पाठविलेले पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने हाणून पाडले आहेत. हीरानगर सेक्टरमधील रठुआ गावात पहाटे पाचच्या सुमारास जवळच्या सैनिकांनी ते पाहिले. ड्रोनमध्ये काही शस्त्रेही बांधली गेल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनला एक रायफल, दोन मॅगजीन , 60 राउंड आणि सात ग्रेनेड्स बांधलेले होते, जे जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, पाकिस्तान दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये सक्रिय ठेवण्यासाठी अशाप्रकारे शस्त्र पुरवठा करीत आहे, जेणेकरून खोऱ्यात हिंसक घटना घडतील. मात्र, शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित होऊ नये म्हणून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. सीमेवरील छोट्या – छोट्या हालचालींवर लष्कराचे बारीक लक्ष आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कुपवाडा, राजौरी आणि जम्मू सेक्टरमध्ये अशी शस्त्रे आणण्याच्या प्रयत्नांचा भांडाफोड केला आहे. ड्रोन पाडण्याच्या घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या दलाने सकाळी 5.10 च्या सुमारास सीमा चौकी भागात आकाशात एका ड्रोनला फिरताना पहिले. बीएसएफ जवानांनी 9 गोळ्या झाडल्या आणि ड्रोनला भारतीय हद्दीत 250 मीटर अंतरावरुन मारून पाडले.

पाकिस्तान गेल्या काही काळापासून ड्रोन वापरत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्येही सीमेवर सुरक्षा दलाने ड्रोन हाणून पाडले. येथे, एलओसीवरही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू होता. यामुळे एलओसीवर वातावरण बर्‍यापैकी तणावपूर्ण आहे. दरम्यान, पाकिस्तान या दिवसांत गोंधळला आहे, कारण सैन्याने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही तासांत 8 दहशतवादी ठार झाले आहेत.