Video : PM मोदींनी चीनला दिला कठोर संदेश, म्हणाले – ‘विस्तारवादाचं युग आता संपलंय’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था –   अचानक लडाखच्या दौऱ्यावर आलेल्या पीएम मोदी यांनी चीनशी झालेल्या चकमकीत जखमी जवानांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. या दरम्यान सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, गलवान खोऱ्यात देशातील वीर पुत्रांनी दाखवलेली अदम्य हिम्मत ही वाखाणण्याजोगी आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी चीनला कडक संदेश दिला आणि ते म्हणाले की, आता विस्तारवादाचे युग संपुष्टात आले आहे, हे विकासाचे युग आहे.

पंतप्रधान मोदींच्या लडाख दौऱ्यातील ठळक मुद्दे –

–  गलवान खोऱ्यात देशातील शूरवीरांनी दाखवलेलं अदम्य साहस म्हणजे पराक्रमाचा कळस होय. देशाला तुमचा अभिमान वाटतो.

–  जेव्हा मी राष्ट्रीय सुरक्षेवर आधारीत निर्णयाचा विचार करतो तेव्हा मी दोन मातांचा विचार करतो. पहिली म्हणजे आपली भारत माता आणि दुसरी म्हणजे आपल्या माता ज्यांनी आपल्यासारख्या शूर लोकांना जन्म दिला आहे.

–  मी माझ्या समोर महिला सैनिक पहात आहे. सीमेवर रणांगणातील हे दृश्य प्रेरणादायक आहे….आज मी तुमच्या अभिमानाविषयी बोलतो.

–  पंतप्रधान मोदींनी चीनला सक्त संदेश दिला आणि म्हणाले की, आता विस्तारवादाचे युग संपले आहे, हे विकासाचे युग आहे. इतिहास साक्षीदार आहे की विस्तारवादी शक्तीचा नेहमीच पराजय झाला आहे किंवा त्यांना माघार घ्यायला भाग पडले आहे.

–   तुम्ही त्याच पृथ्वीचे वीर आहात, ज्यांनी हजारो वर्षांपासून अनेक हल्लेखोरांच्या हल्ल्यांना आणि अत्याचारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

–  आम्ही बासरी धारक कृष्णाची उपासना करणारे लोक आहोत, तसेच सुदर्शन चक्रधारी कृष्णाला देखील आपला आदर्श मानतो.

–   जगाने आपले अदम्य साहस पाहिले आहे. आपल्या शौर्यकथा घराघरात सांगितल्या जात आहेत. भारताच्या शत्रूंनी तुमची आग देखील पाहिली आणि तुमचा संतापही.

–   गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी आज श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या सिंहनादाने धरती अजूनही त्यांचा जयजयकार करत आहे.

–  आज देशातील प्रत्येक जण आपल्याला आदरपूर्वक नमन करत आहे. आज प्रत्येक भारतीयांची छाती तुमच्या शौर्याने आणि सामर्थ्याने फुगली आहे.

–  तुमचे धैर्य त्या उंचीपेक्षाही विशाल आहे, जेथे तुम्ही तैनात आहात. तुमचा दृढनिश्चय, त्या खोऱ्यापेक्षाही कठोर आहे, ज्याला तुम्ही दररोज आपल्या चरणाने मोजत असतात. तुमचे बाहू त्या खडकांइतके मजबूत आहेत, जे तुमच्या सभोवताली आहेत. तुमची इच्छाशक्ती आजूबाजूच्या पर्वतांप्रमाणे अबाधित आहे.

–  आपले धैर्य, पराक्रम आणि भारत मातेच्या मान-सन्मानाचे रक्षण करण्याचे आपले समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत, ज्या उंचीवर तुम्ही भारत मातेची ढाल बनून तिचे रक्षण, तिची सेवा करतात, त्याचा मुकाबला संपूर्ण जगात कुणीही करू शकत नाही.