मोदींचा बंगालमध्ये नवा नारा : ‘चुपचाप कमल छाप’ आणि…

पुरुलिया : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवर टीका करणे सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला करत टीका केली. यावेळी त्‍यांनी सभेत ‘चुपचाप कमल छाप’ आणि ‘बूथ-बूथ से टीएमसी साफ’ चा नवीन नारा दिला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले कि, ममता बॅनर्जी मला पंतप्रधान मानायला तयार नाहीत मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पंतप्रधान मानणे त्यांच्यासाठी गौरवास्पद काम आहे, अश्या प्रकारची टीका त्यांनी ममता दीदींवर केली आहे.

पुढे बोलताना मोदी म्हणाले कि, ममता दीदी या माझ्‍यासाठी दगड आणि थोबाडीची भाषा करतात, पण मी तर शिव्यांना पचविण्याची ताकद वाढवली असल्‍याचे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला. तसेच पश्चिम बंगालमध्ये आलेल्‍या फनी वादळाच्या पार्श्वभुमीवर मी ममता दीदींना फोन केला, मात्र त्‍यांना इतका अहंकार आहे की, त्‍या देशाच्या पंतप्रधानांशी बोलल्याही नाहीत. ममता सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारच्या सर्व खात्यांवर टीका करताना म्हटले कि, पश्चिम बंगाल सरकारवर शिक्षकही नाराज आहेत. शेतकरीही नाराज आहेत, तसेच देवाचे नाव घेणारेही नाराज आहेत. ममता दीदींना या मातीचा रंग बदलायचा आहे, अशा प्रकारची खरमरीत टीका त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली. या राज्‍याच्या मुख्यमंत्री ममता दीदी आहेत मात्र दुसर्‍याच कोणालातरी पुढे करून दादागिरी करून त्या सरकार चालवत आहेत अशी टीका केली. पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी आता मोदींच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.