Positive India : ‘लॉकडाउन’ दरम्यान मुस्लिम उद्योजक 200 कुटुंबांचा ‘मसीहा’ बनला, वाटले एका महिन्याचे ‘रेशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाउन मुळे गरीब, मजूर, रोजंदारीवरील मजूर, फुटपाथवर छोट्या मोठ्या वस्तू विकणारे, दुकानात काम करणारे आपला रोजगार गमावून बसले आहेत. जर त्यांना दीर्घ काळासाठी रोजगार मिळाला नाही तर ते खातील काय? त्याचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे काही योजना आहे का ?

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर लवकरच मीडिया, सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कोरोना विषाणू, त्याच्याशी संबंधित वास्तविक घटना, लॉकडाउन करण्याचा सरकारच्या निर्णयाचे चांगले वाईट पैलू, तसेच या समस्येवरही लोक सर्वत्र चर्चा करताना दिसले. या दिशेने काही पावले उचलली जावीत, अशी मागणी सरकारकडे केली जात असे, तर कधी सामाजिक संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे अशी अपेक्षा केली जात होती.

या सर्व चर्चेच्या पलीकडे एक व्यक्ती सुंदरगड येथील मशिदीतून मगरीब (सूर्यास्ताच्या) च्या नमाजानंतर बाहेर पडते. शेजारच्याच एका दुकानातून एका सामान्य कुटुंबाला लागणारे एका महिन्याचे रेशन ज्यात तांदूळ, पीठ, डाळ, तेल, साखर, चहा पत्ती, बटाटे, कांदे, अंघोळ आणि कपडे धुण्याचा साबण इत्यादींचा समावेश आहे, या सर्व वस्तू आपल्या कर्मचाऱ्यांद्वारा शेजारच्या काही गरीब परिवारांना पाठवतो, आणि हा संदेश देखील देतो की अन्नाच्या शोधात कुणीही बाहेर पडू नये.

25 मार्चच्या त्या संध्याकाळी एका व्यक्तीचे डोळे ओलावतात. कारण त्या व्यक्तीने सर्वांकडे मदत मागितली होती, परंतु त्याच्या हाती निराशाच आली होती. त्याचे पत्नी आणि दोन मुले असे एक लहान कुटुंब आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे त्याचे काम थांबले होते. 21 दिवसांच्या या लॉकडाउन मुळे त्याच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागत होता. नवरा बायकोच्या डोळ्यात झोप नव्हती. अशा परिस्थितीत त्या थोर व्यक्तीने त्यांच्या घरी एक महिन्याचे रेशन पाठविले. त्याशिवाय त्याच्या परिसरातील इतर अनेक कुटुंबांना या मदतकर्त्याने रेशन पाठवले.

पत्रापाडा येथील रहिवासी जोगेश साहू आणि त्यांची पत्नी एका दुकानात काम करत होते. लॉकडाउनमुळे दुकान बंद झाले तर मालक त्यांना मोबदला कोठून देणार? त्यांच्याकडे असलेल्या पैशांनी फारतर एक-दोन आठवडे जातील, पण त्यानंतर ते काय खातील, याची पती-पत्नीला काळजी वाटत होती. शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या घरी भात वगळता काहीच उरले नाही, तेव्हा त्या मदतकर्त्याने त्यांच्या घरी रेशनचे पाकिट पाठवले. जोगेश म्हणतात – त्या मदतकर्त्याने आम्हाला खूप रेशन दिले आहे, जेणेकरून आमचे कुटुंब एक महिना आरामात चालू शकेल. देव त्यांना दीर्घायुष्य देवो.

सुवार्तेच्या शोधात काही माध्यम प्रतिनिधी त्या मदतकर्त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की रेशनच्या पिशव्या बांधलेल्या होत्या, ज्या गरजूंना पाठवल्या जात होत्या. त्यांच्या कर्मचार्‍यांपैकी एकाने सांगितले की, आतापर्यंत सुंदरगड शहरात 50 हून अधिक लोकांना रेशन देण्यात आले आहे, तर त्याच प्रकारे बडगाव, राजगंगपूर, राउरकेला सहित जिल्ह्यातील 200 हून अधिक लोकांना अशीच मदत करण्यात आली आहे.

सामाजिक संघटनांची वाट न पाहता स्वतः पुढे जाऊन मदत करणारे व्यक्ती म्हणाले की भूक थांबू शकत नाही. म्हणून मी ठरवलं की, मी जितके शक्य असेल तितक्या गरजूंना मदत करीन. मी कोणतीही आर्थिक किंवा इतर मदत देऊ शकत नाही. पण माझा प्रयत्न असेल की या संकटात कुणी उपाशीपोटी मरणार नाही. तसेच अन्नाच्या शोधात बाहेर जाऊन संसर्गाचा बळी कुणीही पडू नये. ते म्हणाले की, हे संकट सर्व लोकांवर आहे, म्हणून आपण एकत्रित लढले पाहिजे, आपल्याला एकमेकांना पाठिंबा द्यायचा आहे, तरच आपण हे युद्ध जिंकू शकतो.

या मदतकर्त्याने त्याचे नाव किंवा चित्र कोणत्याही परिस्थितीत समोर येऊ देण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, याने त्या लोकांना वाईट वाटू शकते, ज्यांना मी मदत केली आहे. मी हे वर्तमानपत्रात नाव किंवा फोटो प्रसिद्ध करण्यासाठी असे करत नाही, हे एक माणुसकीच्या नात्याने मी करत आहे. फक्त मीच नाही तर देशातील बरीच लोक, अनेक संस्था अशा सेवा देत आहेत. जर आपण त्यांच्याबद्दल माहिती सामायिक केली तर अधिक लोकांना मदतीसाठी प्रेरित केले जाईल.