Rafale Deal : ‘राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारावरुन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. गोवा सरकारमधील मंत्री विश्वजीत राणे यांची राफेल करारासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप महिन्याभरापूर्वी काँग्रेसनं ट्विटवर पोस्ट केली होती. हीच पोस्ट राहुल गांधी यांनी सोमवारी(28 जानेवारी) रिट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ऑडिओ क्लिप संदर्भातील ट्विट रिट्विट करताना राहुल गांधी यांनी म्हटले की, ”विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप खरी असून मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल करारासंदर्भातील सर्व गोपनीय माहिती आहे. ही ऑडिओ क्लिप समोर येऊन 30 दिवस झालेत. मात्र याविरोधात अद्यापपर्यंत FIR ही नोंदवली गेली नाही किंवा चौकशीदेखील करण्यात आली नाही.”

नेमके काय आहे प्रकरण?
राफेल विमान करारवरुन काँग्रेसनंभाजपावर 2 जानेवारी रोजी ऑडिओ क्लिप समोर आणली होती. राफेल डीलसंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून जारी करण्यात आली होती त्यानंतर मात्र या क्लिपमुळे राफेल डील प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणेंनी म्हटलं की,”राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.” गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी करारासंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर निशाणा साधला.

ऑडिओ क्लिप माझी नाही : विश्वजित राणे
दरम्यान, काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ”क्लिपमधील संभाषण काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीनं समोर आणण्यात आले आहे. या क्लिपची लॅबटेस्ट करावी”,अशी मागणीही राणे यांनी केली होती. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला. शिवाय, “काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये, जेणेकरुन कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तसंच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राफेल डील किंवा यासंदर्भातील कागदपत्रांबाबत कधीही कोणतेही विधान केले नव्हते” असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले होते.