भारतानं प्रत्येक आव्हानाचा सामना धैर्याने केला आणि दुसर्‍या देशांना मदतही केली : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रात भारताला अस्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी प्रथमच संयुक्त राष्ट्रात आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सत्राला संबोधित केले. इकोसॉकला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत, यादृष्टीने त्यांचे भाषण विशेष महत्वाचे होते. पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात त्या पद्धती आणि निर्णयांचा उल्लेख केला ज्या जीवघेण्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी घेतले होते. या भाषणाचे तीन महत्वपूर्ण पैलू होते. पहिला क्लायमेट चेंजबाबत केलेले प्रयत्न, दुसरा कोविडला रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि तिसरा संकट काळात आपत्तीतून यशस्वीपणे मार्ग काढणे.

भारताने केलेले विविध प्रयत्न किती यशस्वी झाले, हे पीएम मोदी यांनी जगाला सांगितले. आर्थिक आणि सामाजिक परिषद संयुक्त राष्ट्राच्या 6 प्रमुख विभागापैकी एक आहे. आपल्या या भाषणात त्यांनी 1946 मध्ये इकोसॉकचे पहिले अध्यक्ष भारतीय सर रामास्वामी मुरलीधर यांचा उल्लेख केला. मुरलीधर मैसूरचे शेवटचे दिवाण सुद्धा होते. इकोसॉकच्या 70व्या वर्धापन दिनी जानेवारी 2016 मध्ये पीएमने या सत्राला संबोधित केले होते. जाणून घेवूयात त्यांच्या संबोधनातील काही महत्वाचे मुद्दे…

पीएम मोदी म्हणाले, भारताने कोविड-19 च्या विरूद्ध सुरू केलेली लढाई एक जनआंदोलन झाले आहे. भारताने यास रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले, ज्यामध्ये लॉकडाऊनपासून रूग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टींग आणि उपचार यांचा समावेश आहे. या दरम्यान लाखो लोकांच्या रोजगारावर आलेले संकट पाहून सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज देशातील सर्व खालच्या स्तरातील लोकांच्या मदतीसाठी देण्यात आले होते. या दरम्यान त्यांना आर्थिक मदतसुद्धा देण्यात आली.

केंद्रात सरकार आल्यानंतर भारतात जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत लागू केली. याशिवाय देशात मागील सहा महिन्यांच्या आत चाळीस कोटी बँक खाती उघडण्यात आली. कोविड-19 च्या संकटादरम्यान याद्वारे गरीब लोकांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आले. सरकारच्या योजनेमुळे मध्यस्थींचे मार्ग बंद झाले आणि गरीबांचे कल्याण झाले. मागील सहा वर्षात सरकारने गावागावात शौचालये बनवली आणि देश घाणीपासून मुक्त केला. या दरम्यान गरीबांसाठी घरे बनवली. भारत सरकारचे स्वप्न आहे की, प्रत्येक नागरिकाचे आपले स्वताचे घर असावे, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे.

भारताने कोविड-19 जागतिक संकटात आपल्या सोबत इतर देशांकडेही लक्ष दिले. अनेक देशांना मदत आणि जरूरी वस्तू पुरवल्या. याशिवाय भारताने उपक्रम राबवून सार्कमध्ये या महामारीचा विचार करून वेगळा विभाग बनवला आणि त्यामध्ये सर्वात आधी आपले योगदान दिले. कोविड-19 महामारीने जगाची आर्थिक स्थिती बिघडवली आहे, तसाच भारत सुद्धा वाईट काळातून जात असताना या वाईट काळालाही चांगले मानत पुढे पाऊल टाकले आणि आत्मनिर्भर भारतची सुरूवात केली. याच्या मदतीने अनेक वस्तूंचे उत्पादन या संकटाच्या काळात आम्ही करू शकलो आणि या वस्तू इतरांनाही पाठवल्या.

पीएम मोदी म्हणाले, सरकार सबका साथ, सबका विकास या लक्ष्यकडे पुढे जात आहे. आम्ही केवळ भारताच्या भल्यासाठी काम करत नाही, तर संपूर्ण जगासाठी काम करत आहोत. भारताने यशस्वीपणे सिंगलयूज प्लास्टिकचा वापर कमी करून कार्बन उत्सर्जन खुप कमी केले आहे. आणि सतत हे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही 2030 चा अजेंडा पूर्ण करण्यासाठी भरीव प्रयत्न करत आहोत. कोविड-19 च्या दरम्यान भारताने अनेक नैसर्गिक आपत्तींचा सुद्धा सामना केला. यामध्ये भूकंप, पूर आणि वादळाचा समावेश आहे. परंतु, यशस्वी नितीद्वारे सरकारने लाखो जीव वाचवले. या क्षेत्रात भारताने दुसर्‍या देशांनाही मदत केली आहे.