Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस विरूध्दच्या युध्दात उतरली भारतीय सेना, लॉन्च केलं ‘ऑपरेशन नमस्ते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोना विरोधातील या लढ्याला भारतीय लष्करानं ‘ऑपरेशन नमस्ते’ असे नाव दिले आहे. भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी एका वृत्तसंस्थेने संवाद साधला. यावेळी लष्कर प्रमुख नरवणे यांना कोरोना व्हायरसच्या फैलावाचा लष्कराच्या कामकाजावर काय परिणाम झाला ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

लष्कर प्रमुख नरवणे म्हणाले, देश कोरोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खबरदारी म्हणून काही उपयाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही पावले आवश्यक होती, असे त्यांनी सांगितले.

आपातकाली योजना तयार
आमच्याकडे आपातकालीन योजना तयार असल्याचे नरवणे यांनी सांगितले. कोरोना व्हायरसचा फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नव्याने आखणी केली जाऊ शकते. मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणमधून आलेल्या भारतीयांना याठिकाणी ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती नरवणे यांनी दिली.

सैनिकांच्या सुट्ट्या रद्द
लष्कर प्रमुख नरवणे यांनी सांगितले की, नियंत्रण रेषा किंवा वास्तविक नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांची चिंता करू नये व सुट्ट्या रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान अशीच परिस्थिती होती. त्यावेळी यशस्वी झालोच होतो. तसेच ‘ऑप्रेशन नमस्ते’ देखील यशस्वी होईल असा विश्वास नरवणे यांनी व्यक्त केला.

सरकार आणि जनतेला मदत
लष्कर प्रमुख नरवणे म्हणले, कोरोना विषाणू विरुद्धच्या या लढाईत सरकार आणि जनतेला मदत करण्याची आमची जबाबदारी आहे. सेना प्रमुख म्हणून माझे सैनिक सुरक्षित आणि तंदुरुस्त राहणे याला माझे पहिले प्राधान्य असेल. ज्यावेळी आपण सुरक्षित असतो तेव्हाच आपण आपल्या कर्तव्यामध्ये सेवा देऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.