दिल्ली-NCR मध्ये पुन्हा ‘भूकंप’, 24 तासात दुसर्‍यांदा जाणवले ‘झटके’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी दुपारी 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, रविवारी देखील दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, रविवारपेक्षा आजच्या भूकंपाची तीव्रता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. एककिडे कोरोनामुळे नागरिक भयकभित असताना भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिक आणखीनच भयभीत झाले आहेत.

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने नागरिक मोठ्या संख्येने आपल्या घरात आहेत. आज दुपारी भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिकांनी घरे सोडून रस्त्यावर धाव घेतली. रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाच्या धक्के बसले होते. रविवारी भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केलच्या आसपास होती. जर भूकंपाची तीव्रता 6 च्या वर असेल तर त्या परिसरात मोठी हानी होऊ शकते.

देशात लॉकडाऊन असल्याने लोक घरामध्ये आहेत. भूकंपामुळे लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. अद्याप भूकंपाचा केंद्र बिंदू समजू शकला नसून तो लवकरच समजेल असे सांगण्यात येत आहे.