COVID-19 : US नंतर आता भारतानं ‘कोरोना’च्या रुग्णांसाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ या औषधास दिली ‘मंजुरी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने स्थापन केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने कोविड -१९ च्या उच्च जोखमीच्या घटनांमध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विन (hydroxychloroquine) ची शिफारस केली आहे. तथापि, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेण्यास मनाई आहे. यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मलेरिया रोधक औषध हायड्रोक्सी क्लोरोक्विनला संभाव्य गेम चेंजर म्हणून पेश केले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांच्या उपचारासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association, IMA) चे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया (Heart Care Foundation of India) चे अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी मागणी केली होती की कोरोना रूग्णांच्या उपचारामध्ये या औषधाच्या वापरास मान्यता देण्यात यावी.

युरोपियन युनियनच्या क्लिनिकल चाचणीमध्ये अग्रवाल यांनी या औषधाच्या प्रभावाचा २५ रुग्णांवर अभ्यास केला आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन रूग्णांमधील विषाणूला वेगाने कमी करतो. चाचणी दरम्यान हे औषध देण्याच्या सहाव्या दिवशी, जेव्हा रुग्णांची तपासणी केली गेली तेव्हा सकारात्मक प्रकरणे केवळ २५ टक्केच होती. एका वृत्तानुसार, हा अभ्यास आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ अँटीमायक्रोबायल एजंट्स मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या औषधाने रुग्णाला कोणतेही साइड इफेक्ट देखील होत नाहीत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की या औषधाच्या सुरुवातीच्या चाचणीत खूप उत्साहजनक निकाल समोर आले आहेत. कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी निगडीत हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. ट्रम्प यांच्या मान्यतेनंतर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोरोना विषाणूच्या रूग्णांच्या उपचारासाठी हे औषध देण्यास मान्यता दिली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेत या औषधाचे सुरुवातीस परिणाम खूपच उत्साहवर्धक असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान जगात या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा १४,००० च्या जवळपास पोहोचला आहे.