TN : 2 जिल्हाधिकार्‍यांचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं प्रचंड खळबळ, रूग्णालयात उपचारासाठी दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या कोयंबटूर आणि कांचीपुरम जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोयंबटूर येथे बुधवारी जिल्हाधिकारी के. राजामणी (K. Rajamani) आणि कांचीपुरमचे जिल्हाधिकारी पी. पोन्निया (P. Ponniah) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता दोघांचीही तब्येत स्थिर आहे. तामिळनाडूमध्ये असे प्रथमच घडले आहे की जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असावी. यापूर्वी तीन मंत्री आणि अनेक आमदारांमध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी केली गेली होती.

तामिळनाडूमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 1,51,820 वर पोहोचली
तामिळनाडूमध्ये कोरोना संक्रमणाची संख्या आता 1,51,820 वर पोहोचली आहे, त्यापैकी 1,02,310 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत आणि आपल्या घरी परतले आहेत. त्याचबरोबर अद्याप 47,343 लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, तर या प्राणघातक विषाणूमुळे 2,167 लोक मरण पावले आहेत.

देशात 9.68 लाखाहून अधिक प्रकरणे
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूची 9.86 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 6 लाख 12 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना विषाणूची 9 लाख 68 हजार 876 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्णांची नोंद झाली असून 6 लाख 12 हजार 815 लोक स्वस्थ झाले आहेत. तसेच या विषाणूमुळे 24 हजार 915 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 32,695 प्रकरणे नोंदली गेली असून या कालावधीत 606 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 3 लाख 26 हजार 826 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.