‘सर्वांचं लसीकरण करा असं न्यायालयानं सांगितलं, आता लस उपलब्ध नाही तर काय आम्ही फाशी घ्यायची का?’ – मोदी सरकारमधील मंत्र्याचं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यावरूनच केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांनी भाष्य केले.

महाराष्ट्रासह विविध राज्यांत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच न्यायालयाने सर्वांचे लसीकरण करा, असे सांगितले आहे. त्यावरून सदानंद गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना विधान केले. ते म्हणाले, ‘जर लसींचे उत्पादनच झाले नाही तर लसीकरण होणार कसे? आणि लसीकरण झाले नाहीतर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी फाशी घ्यायची का? तसेच न्यायालयाने चांगल्या हेतूने देशातील सर्वांचे लसीकरण करावे असे सांगितले. सरकार आपले काम निस्वार्थ आणि गांभीर्याने करत आहे. ज्यामध्ये काही त्रुटीही समोर आल्या आहेत. एक-दोन दिवसांत लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी सरकार सुनिश्चित करत आहे, असेही ते म्हणाले.

वर्षाखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण

भारतात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस दिले जाऊ शकते. सरकारने डिसेंबरपर्यंत लस उपलब्ध करण्यासाठी रोडमॅपही सादर केला आहे. त्यानुसार, जुलै महिन्यापर्यंत देशात एकूण 51.6 कोटी लसींची मात्रा उपलब्ध केली जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे 17 कोटी लस दिली गेली आहे. त्यातच डिसेंबरपर्यंत 216 कोटी लसींचे उत्पादन केले जाणार आहे. वर्षाखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण होईल, असेही सांगण्यात आले आहे.