उन्नाव केस : माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरच्या शिक्षेवर शुक्रवारी निर्णय होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडीलांच्या हत्येतील प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या अन्य दोषी साथीदारांना देण्यात आलेल्या शिक्षेवर आता तीस हजारी न्यायालय शुक्रवारी निर्णय सुनावणार आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान शिक्षेवर चर्चा होणार होती परंतु काही कारणाने ही सुनावणी टाळण्यात आली. यामुळे या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या उत्तर प्रदेशच्या भाजपच्या माजी आमदारासाठी (कुलदिप सिंह सेंगर) शुक्रवारचा दिवस महत्वाचा असणार आहे.

यापूर्वी 4 मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये तीस हजारी न्यायालयाच्या सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सेंगरसह 7 जणांना पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवले होते आणि शिक्षेच्या सुनावणीसाठी 12 मार्चची तारीख निश्चित केली होती परंतु ही सुनावणी आज होऊ शकली नाही.

न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला कलम 304 आणि 120 बी अंतर्गत दोषी ठरवले होते. न्यायालयाने ज्या 7 आरोपींनी दोषी ठरवले, त्यातील सेंगरसह उत्तर प्रदेश पोलीसचे दोन अधिकारी देखील होते. यातील एक एसएचओ आणि दुसरा उपनिरीक्षक होता.

पीडितेच्या वडीलांची न्यायालयीन कोठडीत असताना 9 एप्रिल 2018 मध्ये मृत्यू झाला होता. यासंबंधित पीडीतेने न्याय मिळावा अशी मागणी केली परंतु पोलीस प्रशासनाकडून काहीही संतोषजनक आश्वासन देण्यात आले नाही.

या प्रकरणी 4 मार्चला आपल्या निर्णयात तीस हजारी न्यायालयाने उत्तर प्रदेशचा माजी आमदार सेंगरसह 7 आरोपींना दोषी ठरवले होते. तर 4 आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले. या प्रकरणी एकूण 11 जणांचा केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपी ठरवले होते.

यांना सुनावण्यात येणार शिक्षा –

1. कुलदीप सेंगर (माजी आमदार) – दोषी

2. कामता प्रसाद, उपनिरीक्षक – दोषी

3. अशोक सिंह भदौरिया, SHO – दोषी

4. शैलेंद्र सिंह उर्फ टिंकू सिंह – मुक्त

5. विनीत मिश्रा उर्फ विनय मिश्रा – दोषी

6. बीरेंद्र सिंह उर्फ बउवा सिंह – दोषी

7. राम शरण सिंह उर्फ सोनू सिंह – निर्दोष

8. शशि प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह – दोषी

9. अमीर खान, कॉन्स्टेबल – मुक्त

10. जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह – दोषी

11. शरदवीर सिंह – मुक्त