आगामी 24 तासात राज्यातील ‘या’ 6 जिल्हयात पावसाची शक्यता, वेधशाळेचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील वर्षात हवामानामध्ये अनेक बदल झाले. त्यात आता येत्या आठवड्यात विदर्भातील काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पाऊस होणार असल्याची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारताच्या उत्तर भागात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत आले आहे. यानंतर मध्य भारतातही हवामान खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासांत अनेक शहरांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील 24 तासांत हलक्या सरी बरसतील . तसेच नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांत या पावसाचा फटका बसणार आहे. तर मुंबई येथे ढगाळ वातावरण राहील. तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये येत्या 48 तासांत हवामान आणखी खराब होण्याची शक्यता असून राज्यांच्या पूर्वेकडील आणि मध्य भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनतर येत्या 24 तासांत आंध्रप्रदेश, विदर्भ, तेलंगणा, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही ठिकाणी वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दक्षिण जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भाग ढगाळ वातावरणासोबतच हलका पाऊस पडेल. पुढील 24 तासांच्या दरम्यान, पश्चिम अस्थिरतेच्या परिणामासह दिवसा आणि रात्रीचे तपमान नोंदवले जाईल. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडीपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

हवेची गुणवत्ता खालावली
मिळालेल्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील आनंद विहार परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणी असून त्याचबरोबर पंजाबी बाग, लोधी रोड आणि आयटीओमध्ये हवेची गुणवत्ता खराब श्रेणी असल्याचे समजते. मात्र, येत्या काही काळात त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.