Weather Update : देशातील बर्‍याच भागात ‘मुसळधार’ पावसाचा ‘इशारा’, जाणून घ्या कुठपर्यंत पोहोचला ‘मान्सून’

नई दिल्ली : वृत्तसंस्था : देशाच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सून सामान्य वेगाने पुढे सरसावत आहे. दक्षिण भारत आणि गोव्याला पार करत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशाच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगड, दक्षिणपूर्व मध्य प्रदेश, किनारी कर्नाटक, कोकण गोवा आणि गुजरात प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारत, केरळ, मध्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, उर्वरित मध्य प्रदेश, राजस्थानातील काही भाग, जम्मू-काश्मीर, मुझफ्फराबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज हलका पाऊस किंवा सरी बरसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज महाराष्ट्रातील बर्‍याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

मान्सून येण्यापूर्वीच गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात साचले पाणी

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत मान्सून दक्षिण गुजरातमध्ये पोहोचेल. परंतु मान्सून येण्यापूर्वीच गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसानंतर अहमदाबादसह अनेक भागात रस्ते पाण्याने भरले आहेत. गुजरातमधील 6 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागात झाडे आणि होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

नियोजित तारखेच्या एक दिवस अगोदरच मान्सून मध्य प्रदेशात हजेरी लावेल

रविवारी मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडील भागातून मान्सून दाखल होण्याची हवामानशास्त्रज्ञांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासह राज्याच्या दक्षिण-पश्चिम भागात चांगला पाऊस पडण्यास सुरू होईल. केंद्राच्या हवामान खात्याने मागच्या महिन्यात मध्य प्रदेशात मान्सूनचे आगमन होण्याची अपेक्षित तारीख 15 जून निश्चित केली आहे. त्याआधी ही तारीख 10 जून निश्चित करण्यात आली होती. हवामानशास्त्रीय केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून मध्य महाराष्ट्रातील काही भाग, विदर्भातील बहुतेक भाग, छत्तीसगड मधील काही भाग, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड व्यतिरिक्त बिहारच्या काही भागांत पुढे सरकला आहे. रविवारी मान्सून दक्षिण मध्य प्रदेशात पोहोचेल.

ढगांच्या हालचालीदरम्यान आज उत्तर प्रदेशात बरसतील सरी

आकाशात ढगांची हालचाल सुरु असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ढगांच्या हालचालीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडेल. शनिवारी सकाळपासूनच राजधानीत कडक ऊन पडले होते.

परंतु दुपारनंतर ढगांची हालचाल सुरू झाली. सायंकाळी नैऋत्य वाऱ्यांमुळे हवामान सुखद झाले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन-तीन दिवस हवामान असेच राहील अशी अपेक्षा आहे. दक्षिण पूर्वेकडील वारा ओलावा आणत आहे आणि पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीरवरही परिणाम होत आहे. यामुळे हवामानात ओलावा आहे. राज्यात तुरळक ठिकाणी सरी बरसत आहेत. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान 39 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.