बलाढ्य भाजपची ‘या’ कारणामुळे YSR काॅंग्रेसशी जवळीक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायएसआर काँग्रेस सरकारचा शपथविधी समारंभ आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ३० मे रोजी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले. त्यानंतर त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे रेड्डी भाजपला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी नेत्रदीपक विजय मिळवून आपणच आंध्रप्रदेशचे हिरो आहोत हे दाखवून दिले आहे. वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत. जगनमोहन रेड्डी यांचा शपथविधी ३० मे रोजी विजयवाडा येथे इंदिरा गांधी महापालिका स्टेडियमवर होणार आहे. देशभरात भाजपाला बहुमत मिळाले असले तरी आंध्रप्रदेशमध्ये भाजपाला खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्यासाठी भाजपला आंध्रमधील स्थानिक नेत्याची मदत घेण्याची गरज आहे. या सर्व घडामोडींवर वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि अमित शाह यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच ते जगनमोहन रेड्डींनी अमित शहांचीही भेट घेतल्याने ते एनडीएमध्ये प्रवेश करणार का या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

जगनमोहन रेड्डींनी टाळला शरद पवारांचा फोन –

एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. पण त्यांनी शरद पवारांचा फोन उचलणे टाळले होते. तसेच त्यांनी निवडणुकीपूर्वी आपली आपली भूमिका जाहीर केली नव्हती.