सेनेचा वचपा काढण्यासाठी भाजपची राष्ट्रवादीला मदत ?

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येवून ठेपले असतांनाच राज्यातील सेना-भाजप युतीमधील दुरावा वाढत असल्याचे दिसुन येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपची हक्काची जागा असतांना शिवसेनेने आपली उमेदवारी देत भाजपला एक प्रकारे मोठे आव्हान दिले आहे. तर त्या बदल्यात भाजपने सेनेच्या उमेदवारांना पराभुत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांना मदत करत सेनेवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली असुन सेनेतर्फे राजीव साबळे यांना संधी देण्यात आली आहे. कोकणातील सेना-भाजपचे संख्याबळ पाहता विजय संपादीत करणे सहज शक्य होते. परंतु सेना-भाजपमधील कलगीतुरा पाहता ते आजच्या घडीला शक्य दिसत नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात जागा लढविल्याचा वचपा काढण्यासाठी रा.कॉ.पक्षाचे उमेदवारांना मदत करण्याचे भाजपने ठरविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आमदार सुनील तटकरे यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि सर्व पक्षियांसोबत असलेले संबंध पाहता त्यांना हि निवडणुक सहजरित्या जिंकता येणार आहे. खा.नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाकडे असलेली ९७ शेतकरी कामगार पक्षाची एकगठ्ठा असलेली तीन आकडी मते देखील मिळवण्यात तटकरे यांना यश आले आहे. कॉग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याने तसेच मनसे-रिपाई सोबत केलेल्या महाआघाडीमुळे त्यांची मते सुद्धा अनिकेत तटकरे यांच्या पारड्यात पडणार आहेत. केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात आहे असे असतांना सेनेच्या उमेदवाराला निवडुन आणणे मंत्री गीतेंना “अवघड” जाणार आहे.

कोकण मतदारसंघातील भाजपकडे असलेली तब्बल १५० मते आता राष्ट्रवादीला मिळणार की सेनेला हे गुलदस्त्यात असल्याने निकालानंतरच स्पष्ट होईल.