‘पवार, सुळे निष्ठावंतांना अपमानित करतात ; घराणेशाहीमुळे संधी नसल्याने भाजपात प्रवेश’ : राहुल शेवाळे

सासवड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भर कार्यक्रमात अजित पवार, सुळे या निष्ठावंतांना अपमानित करतात. घराणेशाहीमुळे येथे कोणालाही संधी मिळणार नाही म्हणून मी भाजपात प्रवेश करत आहेत असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. शेवाळे यांच्या भाजपा प्रवेशाने बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. इंदापूर, पुरंदर आणि भोरमधील काँग्रेसचे कार्यकर्ते सुळे यांचे काम करण्यास तयार नसल्याची चर्चा असतानाच आता शेवाळे यांच्या भाजपा प्रवेशाचे समजत आहे.

राहुल शेवाळे गेल्या २५ वर्षांपासून पुरंदर-हवेलीच्या राजकारणात आहेत. ते अजित पवार यांचे समर्थक आहेत. परंतु आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील डोकेदुखी वाढणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गुरुवारी बैठक पार पडली. येत्या दोन दिवसांत पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. या बैठकीला भाजप आमदार बाळा भेगडे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक आणि बाळासाहेब गावडे, राहुल कुल उपस्थित होते.

दरम्यान याबाबत बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, “तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित नेते विजय कोलते, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, दिगंबर दुर्गाडे या नेत्यांमुळे तरुण आणि शिक्षित लोकांना न्याय मिळत नाही. उलट भर कार्यक्रमात अजित पवार, सुळे निष्ठावंतांना अपमानित करतात. घराणेशाहीमुळे येथे कोणालाही संधी मिळणार नाही, असे चित्र असल्याने भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे शेवाळे म्हणाले.