मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी खास भूमिका बजावणार्‍या ‘नॉटी’नं घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइनः मुंबईत 2008 मध्ये झालेेल्या 26/11 चा भीषण दहशतवादी हल्ला देशातील नागरिक कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्यावेळी शस्त्र अन् दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या कामात अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या सेवानिवृत्त कॅनिंग सैनिक नॉटी या श्वानाचा (वय 14) सोमवारी (दि. 10) मृत्यू झाला आहे. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. नॉटीचा मृत्यू झाला असला तरी त्याने बजावलेली कामगिरी नक्कीच स्मरणात राहण्यासारखी आहे.

पालघरमधील सफाळे येथील माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी नॉटीला दत्तक घेतले होते. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा 2014 मध्ये सेवानिवृत्त झाला होता. नॉटी अचानक आजारी पडला. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याला शौर्य पुरस्कार मिळाला होता. 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यातील 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल कसाब हा पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता हे समोर आले होते.