निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या दावणीला बांधलेला : नवाब मलिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विरोधकांनी दाखल केलेली व्हीपॅटच्या ५० टक्के मतमोजणीच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लागवली. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून नरेंद्र मोदी यांना ९ वेळा क्लिन चिट देण्यात आले. निवडणूक आयोगाने मोदींना क्लिन चिट दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यनंतर राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे.

राष्ट्रवादीने यानंतर ट्विटरवर म्हटले आहे की, जनतेमध्ये लोकशाहीवरचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत आहे. मात्र, निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला असल्याची टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

९ हजार कोटींचा खर्च करून व्हीव्हीपॅट यंत्रणा उभारण्यात आली आहे, त्याबाबत लोकांच्या मनात शंका असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र हे सरकार यात सक्रीय नाही, असा आरोप राष्ट्रवादीने ट्विट करत सरकारवर आरोप केला आहे. तसेच व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची शक्यता असतानाही निवडणूक आयोगाकडून यावर मार्ग काढण्यात आलेला नाही, यातून निवडणुकीच्या निकालादरम्यान घोळ होण्याची स्पष्ट चिन्हे असल्याचे राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.