मलिकांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचे पाठबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पाठबळ दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे,’ असे मलिक म्हणाले.

मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेतेमंडळींची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये नवाब मलिक यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली. राज्याला अधिकार नसताना कायदा केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पाठबळ दिले आहे. जी लोकं सरकारविरोधात याचिका दाखल करत आहेत, त्यांनी मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. या निकालानंतर आता केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने आता कायदा पारीत करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे. 102 जी घटना दुरुस्ती केली होती त्यामध्ये 2018 मध्ये नवीन कलम लावण्यात आले आहे.

कायदेशीर पर्याय उपलब्ध…

मराठा आरक्षणाचा हा लढा अद्याप संपलेला नाही. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण टिकविण्यासाठी काय कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, यावर विचारविनिमय सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झाली नाही. ती मिळाल्यानंतर यासंदर्भात सविस्तर कार्यवाही करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.