बिहारमध्ये महिलेला ‘डायन’ ठरवून केली हत्या

नवादा : वृत्तसंस्था – बिहारमधील नवादा जिल्ह्यातील कोयलीगड गावात गावकऱ्यांनी एका ५० वर्षाच्या महिलेला डायन ठरवून तिला जबरदस्त मारहाण केली. त्यात तिचा मृत्यु झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मंती देवी मांझी (वय ५०) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गोविंदपूर पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी बिरजु मांझी, सुरेश मांझी, कारु मांझी आणि नरेश मांझी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंती देवीचे पती प्रसादी मांझी यांनी फिर्याद दिली आहे. प्रसादी मांझी यांनी सांगितले की, मंती देवी या मंगळवारी सकाळी पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी अगोदरच हे सर्व जण तिच्या पाळतीवर होते. त्यांनी तिला घेरले व ती डायन असल्याचा आरोप करीत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते तिला बराच वेळ मारहाण करत होते. तिचा आरडाओरडा ऐकूनही कोणी पुढे आले नाही. शेवटी ती निपचित पडल्यावर सर्व जण निघून गेले. प्रसादी मांझी हा मंती देवी हिला घेऊन गोविंदपूर पोलीस ठाण्यात गेला. तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करुन यात आणखी कोण कोण सहभागी होते त्यांची माहिती घेतली जात आहे. यापूर्वीही बिहारमध्ये अंधश्रद्धेतून महिलेला डायन ठरवून तिला मारुन टाकण्याच्या घटना घडल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –