कोल्हापूर : अंबाबाईचं मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिर नवरात्र काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे. यंदाचा नवरात्रौत्सव लोकसहभागाशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

परंपरेप्रमाणे नवरात्रौत्सवात सर्व विधी करण्यात येतील. 9 दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे. परंतु नवरात्रौत्सवात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील. या काळत सर्व विधीचं थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल अशी माहिती महेश जाधव यांनी दिली मंदिर रोज सॅनिटाईज केलं जाणार आहे.

यंदाच्या उत्सव काळात पालखी, अंबाबाईची पूजा, नगरप्रदक्षिणा यावेळी देखील भाविकांना उपस्थित राहता येणार नाही. देवीची रोज विविध रुपात पूजा करण्यात येईल. त्याचं दर्शन भाविकांना व्हावं यासाठी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

दरवर्षी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र कोरोनामुळं यंदा ते रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यास पोलीस, आपत्कालीन विभाग यांचीही आज बैठक घेण्यात आली. यंदा नगरप्रदक्षिणा पालखी वाहनातून नेण्यात येणार आहे. टेंबलाईवाडी येथे होणारा कोवाळ पंचमीचा कार्यक्रम ठराविक भाविकांच्या उपस्थितीत करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.