शिवसेनेत ‘उद्वेग’ ! 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईतील एरोली आणि बेलापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातून शिवसेना संपविण्यात येत असल्याचा आरोप करीत २०० पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवून दिले आहेत.

नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना भाजपापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. ऐरोली या विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचे लक्ष्मण चौगुले यांचा ८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतले होते.

त्यामुळे एरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या वाटेला गेल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवून दिले आहेत. त्यात उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नवी मुंबईतून शिवसेना संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. पण, आता गणेश नाईक भाजपामध्ये आल्याने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना डावलून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे काय निर्णय घेतात, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गणेश नाईक जरी पक्षात आले तरी भाजपाचे पारंपारिक मतदार किती साथ देतात, याला महत्व आले आहे.

Visit : Policenama.com