अधिवेशनानंतर अवघ्या 24 तासात भाजपला धक्का, 4 नगरसेवकांनी दिला राजीनामा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईत भाजपला मोठे खिंडार पडले आहे. शहरातील चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. महापालिकेवर सत्ता गाजवणारे गणेश नाईक यांच्या गडाला सुरुंग लागला आहे. राजीनामा दिलेले हे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

तुर्भेतील नगरसेवक असलेले सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांनी महापालिकेच्या आयुक्त आणि सचिवांकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने गणेश नाईकांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते असलेल्या गणेश नाईकांनी विधानसभेच्या तोंडावर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे.

नवी मुंबईत नेरुळमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. भाजपने विधानसभा निवडणूकीनंतर संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटलांनी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली, त्यानंतर 24 तासाच्या आतच भाजपच्या नगरसेवकांनी आपला राजीनामा दिला.

विधानसभेपूर्वी नाईक सर्व नगरसेवकांना घेऊन भाजपच्या तंबूत दाखल झाले होते, त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्ये संपाताची भावना होती. आपल्याला डावललं जातंय अशी त्यांची भावना होती, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेशी जवळीक वाढत होती. त्यांचा हा अघोषित शिवसेना प्रवेश मानला जात होता.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतूक केले होते. तसेच तुर्भेतील झोपडपट्टीत एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील असेही शिंदेंनी सांगितले. नवी मुंबईत एकनाथ शिंदे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे गणेश नाईकांच्या अडचणी वाढू शकतात. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांनी गणेश नाईकांना आव्हान दिले होते.

You might also like