महिला, पुरूषांकडून ‘वसुली’ करणार्‍या ५ ‘उद्योगी’ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खोटया गुन्हयात अडकविण्याची धमकी देत महिला तसेच पुरूषांकडून पैशांची वसुली करणार्‍या ५ पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. ते सर्व पोलिस कर्मचारी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पिडीत महिला आणि पुरूषांनी केलेल्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या चौकशी अखेर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निलंबीत करण्यात आलेल्यांपैकी काहीजणांनी तक्रारदारांच्या एटीएम कार्डमधून पैसे देखील काढून घेतल्याचे समोर आले आहे.

सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे आणि वैभव कुर्‍हाडे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. निलंबीत करण्यात आलेले सर्वजण रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. दि. ६ मे रोजी ते रात्री पेट्रोलिंग करीत होते. एरोलीतील पटनी कंपनीसमोरील मार्गावर त्यांना एक महिला आणि पुरूष कारमध्ये आढळले. त्यावेळी रात्रीचे अडीच वाजले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दोघे सहकारी असून काम संपवुन ते घरी जात होते. कारमधील महिला व पुरूष तेथुन निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना दिवा नाका येथे थांबविले. त्यांना कारवाईची भिती दाखविण्यात आली. त्यांच्याकडे ३ लाख रूपयाची मागणी करण्यात आली.

संबंधित महिला व पुरूषाकडे तेवढी रक्‍कम नसल्याने पोलिसांनी त्यांच्या एटीएममधून ४६ हजार रूपये काढून घेतले. महिलेच्या बँक खात्यामधून काही रक्‍कम पोलिसांनी स्वतःच्या खात्यात जमा देखील करून घेतली. त्यानंतर महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेवून उर्वरित रक्‍कमेसाठी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. संबंधित महिला व पुरूषाने त्या पोलिसांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह पोलिस उपायुक्‍त डॉ. सुधाकर पठारे यांच्याकडे लेखी तक्रार केली. तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीअंती त्या पाच पोलिस कर्मचार्‍यांनी गुन्हयात अडकविण्याची भिती घालुन त्यांच्याकडून पैशांची वसुली केल्याचे निष्पन्‍न झाले. दोषी आढळल्यानंतर पोलिस उपायुक्‍त डॉ. सुधाकर पठारे यांची त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.