दुर्दैवी ! दुचाकी – टेम्पोच्या धडकेत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक एका दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सायन – पनवेल महामार्गावर बेलापूर उड्डाणपुलाजवळ घडली असून या मध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी उशीरा रात्री घडला आहे.

सुधाकर बुवा असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुधाकर बुवा हे घरी जात असताना हा अपघात झाला. सुधाकर बुवा हे ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात पोलीस कॉनस्टेबल म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसारा, सुधाकर बुवा हे शनिवारी रात्री घरी जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुधाकर बुवा यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. हा अपघात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बेलापूर उड्डाणपुलाजवळ झाला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.