नवी मुंबई : पामबीच येथे स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सानपाडा येथील पामबीच मार्गावरून बामणदेव देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गापासून काही अंतरावर एका स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीचे वय अंदाजे १५ ते १८ वर्षे असल्याची शक्यता वर्तवली जात असून मुलीची अद्यापर्यंत ओळख पटली नाही. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

पामबीच मार्गावरून बामणदेव देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गापासून काही अंतरावर शुक्रवारी दुपारी पादचाऱ्यांना पाणी साठवण्यासाठी घरगुती वापराची स्टीलची टाकी त्याठिकाणी आढळली. त्या टाकीत मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी टाकीत चादरीत गुंडाळून कोंबलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता. त्यामुळे त्याची ओळख पटली नाही. मात्र, त्याचे वय अंदाजे १५ ते १८ वर्षे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलीची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी टाकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून नेरूळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नेरूळ आणि सानपाडा पोलीस ठाण्यांमध्ये हद्द निश्चित होत नव्हती. कारण ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला आहे. तो कोणत्या पोलीस ठाण्यात येतो यावर बराच वेळा चर्चा सुरु होती. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिसांना उशिर झाला. ही परिस्थिती पाहून घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. अखेर यावर मार्ग निघत नेरूळ पोलिसांकडे हा मृतदेह सोपावण्यात आला.