राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्‍का, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील अनेक आमदार आणि महत्वाचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजांच्या मानधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मागील काही दिवसांपासून पक्षातील अनेक आमदार आणि वरिष्ठ नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. माजी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर आता नवी मुंबईमधील राष्ट्रवादीचे तगडे नेते आणि माजी आमदार गणेश नाईक हे देखील राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेतील ५२ नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी आज दुपारी गणेश नाईक आणि ५२ नगरसेवकांची महापौर जयवंत सुतार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर नवी मुंबईमध्ये देखील भाजपची सत्ता येणार असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला हवा तितका प्रतिसाद मिळाला नसून त्यांचे मताधिक्य कमी झाल्याने पुढील महापालिका निवडणुकीत सत्तेला धोका असल्याचे म्हणत नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती समोर येत आहे. या नगरसेवकांबरोबरच गणेश नाईक हेदेखील प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान, गणेश नाईक यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक हेदेखील या पक्ष प्रवेशासाठी अनुकूल असून आपल्या वडिलांचे मन वळविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आणखी किती आमदार आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –