सिद्धू नंतर आता त्यांच्या बायकोने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी

चंदीगढ : वृत्तसंस्था – पंजाबमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात सापडत असतात. यापुर्वी त्यांनी स्वतः सोबत पक्षालाही अडचणीत आणलं आहे. आता मात्र सिंद्धू यांनी नाहीतर त्यांच्या पत्नीने काँग्रेससमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी चंदीगढ मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांनी पक्षाकडे तसा अर्जही केला आहे.

डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी शुक्रवारी अचानक चंदीगढमधील काँग्रेस भवनामध्ये हजेरी लावली. त्यानंतर लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली आणि चंदीगढ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप छाबड़ा यांना तसा लेखी अर्ज दिला. त्यांच्या या अर्जाने मात्र आता चंदीगढच्या जागेसाठी प्रयत्न करणाऱ्या दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल आणि मनीष तिवारी या जागेचे प्रबळ दावेदार होते. बंसल यांचे नाव लोकसभा जागेसाठी देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. सिद्धूंनीच बंसल यांच्या नावावर आक्षेप घेतला होता. बंसल यांच्यासह चंदिगढ मतदार संघासाठी माजी केंद्रीय मंत्री मनोज तिवारी हेही इच्छुक आहेत.

दरम्यान, आता डॉ. सिद्धू जनसंपर्क अभियान सुरु करणार आहेत. यामुळे बंसल यांच्या गटात चिंतेच वातावरण आहे.