कपिलच्या शो नंतर सिद्धूना ‘या’ महत्वाच्या ठिकाणी प्रवेशबंदी ?

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथील झालेल्या हल्ल्यावर केलेले वक्तव्य नवज्योतसिंग सिद्धू यांना चांगलेच महागात पडले आहे. सिद्धू यांना सोशल मीडियावरून तर ट्रोल केले आहेच. पण सिद्धू यांना कपिल शर्माच्या शो मधून काढून टाकण्यात आले आहे. त्याजागी आता अभिनेत्री अर्चना पुरन सिंग यांची वर्णी लागली आहे. कपिलच्या शो मधून हाकलपट्टी केल्यानंतर सिद्धू यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता फिल्म सिटी मुंबई मध्ये त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार २१ रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत फेडरेशन ऑफ वेस्‍टर्न इंडिया सिने एंप्‍लाईज (FWICE) ने सिध्‍दूंना फिल्‍म सिटी मुंबईत एन्‍ट्री करण्‍यास मज्‍जाव करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, एफडब्‍ल्‍यूआयसीई (FWICE) ने फिल्‍म सिटी व्‍यवस्‍थापनाला एक पत्र लिहून सिद्धू यांना फिल्‍म सिटी मुंबईत येण्‍यास बंदी घालण्‍याची मागणी केली आहे. एफडब्‍ल्‍यूआयसीईने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके फिल्‍म सिटीच्‍या व्‍यवस्‍थापनाला पत्र लिहिले आहे. पत्रात म्‍हटले आहे, त्‍यांनी आपल्‍या स्‍टुडिओमध्‍ये सिध्‍दू आणि पाकिस्‍तानी कलाकार आणि गायकांच्‍या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालावी आणि त्‍यांना शूटिंगची परवानगी देऊ नये.

कपिल शर्माकडून सिध्‍दूंची पाठराखण
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला “कलाकारांवर बंदी घालणे किंवा सिद्धू यांना शोमधून बाहेर काढणे हा समस्येवर उपाय असु शकत नाही. या प्रश्नावर काही ठोस तोडगा काढला पहिजे. जर केवळ सिद्धू यांना शो मधून काढून टाकण्याने हा प्रश्न सुटला असता तर ते स्वतःच हा शो सोडून गेले असते. आपल्याकडे आता तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू झालंय.

#BoycottSidhu, #Boycottkapilsharmashow असे हॅशटॅग चालवण्याचं काम त्यांना दिलं जाते. ज्यामुळे आसपासची परिस्थिती, ज्या प्रश्नांवर बोलायला हवे असे विषय या सगळ्यांपासून तरुणांचे लक्ष वेगळ्याच विषयांकडे वळवलं जातं. मला वाटतं आपण नेमकी समस्या काय आहे, त्यावर उपाय कसा शोधता येईल याचा विचार करायला पाहिजे.’