नवज्योत सिंग सिद्धूंनी ‘या’ पक्षात प्रवेश करावा : भाजपा

चंदीगड : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने हल्ला चढवला आहे. यावेळी हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. अनिल वीज यांनी त्यांना सर्वात अपमानित झालेले नेते म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस त्याचप्रमाणे भाजप दोन्ही पक्षात स्वतःचा अपमान करून घेतला आहे. आता दुसऱ्या कोणत्या नवीन पक्षात ते जाऊ शकत नाही, आता त्यांनी फक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ या पक्षात सहभागी व्हावं.

मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला आणि त्याचबरोबर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस बाहेर आली. कालच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनू इच्छितात. त्यामुळे त्यांच्या संदर्भात काँग्रेस हायकमांडने निर्णय घ्यावा असे म्हटले होते. सिद्धू यांनी काँग्रेसच्या मानप्रतिष्ठेचा मुद्दा थेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सन्मानाशी जोडला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाष्य केले होते कि, जर राज्यात काँग्रेसचा पराभव झाला तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल. आता अमरिंदर सिंग यांच्या या आरोपावर नवज्योत सिंग सिद्धू काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, त्याचबरोबर भाजप नेते अनिल वीज यांच्यावर आता काय तोफ डागतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.